मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेने शहरातील पादचारी आणि रेल्वे पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यामध्ये 29 पूल धोकादायक असल्याचे समोर आले. तसेच अनेक पुलांची दुरुस्ती सुचवण्यात आली. तर अनेक पुलांवरील भार वाढला असल्याने तो भार कामी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने 16 पुलांची दुरुस्ती करून त्यावरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका 14 कोटी 40 लाख रुपये खर्च करणार आहे.
मुंबई पालिका १६ पुलांवरील 'भार' कमी करणार मुंबईमधील अंधेरी येथील गोखले पूल पडून 2 जणांचा तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला होता. या 2 दुर्घटनांनंतर पालिकेने आयआयटी मुंबई व तज्ञांच्या मदतीने शहरातील पादचारी आणि रेल्वे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. या ऑडिट दरम्यान 29 पूल अतिधोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला. त्या 29 पैकी 8 पूल पाडण्यात आले आहेत. 12 पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही पुलांचे काम पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून केले जाणार आहे.त्यानुसार पालिकेने 16 पुलांवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिक अस्फाल्टने (डांबरचा थर) डागडुजी केली जाणार आहे. रेल्वे पुलांवरील मार्गिकेचा थर पूर्णपणे काढून, स्क्रॅपिंग करून त्यावर मास्टिक अस्फाल्टचे थर टाकले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने शाह आणि पारीख या कंत्राटदाराची निवड केली असून कंत्राटदाराला पालिका 14 कोटी 40 कोटी रुपये अदा करणार आहे. पावसाळा धरून येत्या 9 महिन्यात या कंपनीला 16 पुलांवरील भार कमी करण्याची अट घालण्यात आली आहे. याबाबतचे 2 प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.
या पूलांची होणार डागडुजी -
बेलासीस रेल्वे पूल, डायना रेल्वे पूल, फ्रेंच पूल, ग्रँटरोड पूल, केनेडी पूल, सॅण्डहर्स्ट पूल, भायखळा रेल्वे पूल, प्रीन्सेस स्ट्रीट पूल, महालक्ष्मी रेल्वे पूल, प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील कॅरोल पूल (एलफिन्सटन), चिंचपोकळी रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील पूल, करीरोड स्टेशनच्या उत्तरेकडील रेल्वे पूल, वडाळाला रेल्वे स्टेशन जवळील नाना फडणवीस पूल, जीटीबी नगर रेल्वे पूल, माटुंगा पश्चिम रेल्वेजवळील टी. एच. कटारिया पूल, दादरच्या मध्य व पश्चिम रेल्वेवरील टिळक पूल