मुंबई- मुंबईत जागा भेटेल तिथे वाहने पार्क केली जातात. तसेच जागा भेटेल तिथे फेरीवाले बसलेले असतात. शहरातील त्यामुळे फेरीवाल्यांना चाप लावण्यासाठी पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने फेरीवाला धोरण बनवले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने फेरीवाल्यांना लायसन्स देण्याचे निश्चित केले आहे. फेरीवाल्यांना स्मार्ट कार्डचे लायसन्स दिले जाणार असून ते जीपीएस यंत्रणेद्वारे जोडले जाणार आहे. त्यामुळे संबंधित फेरीवाला निश्चित केलेल्या ठिकाणी जागेवरच धंदा करतो का? याची माहिती पालिका प्रशासनाला मिळणार आहे.
हेही वाचा -गोवंडीत कंबोडिया देशातील प्राचीन विष्णूच्या मंदिराचा देखावा
फेरीवाला धोरण 5 वर्षापूर्वी अंमलात आले असून दर 5 वर्षांनी फेरीवाल्यांची संख्या मोजणी बंधनकारक आहे. परंतु, 2014 नंतर फेरीवाल्यांची गणनाच न झाल्याने नव्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी पालिकेला करता आली नाही. 2014 मध्ये पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात मुंबईत 99 हजार 438 फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेने तयार केलेल्या नव्या धोरणानुसार 99 हजार फेलीवाल्यांपैकी फक्त 52 हजार फेरीवाल्यांनीच अर्ज दाखल केले आहेत. तर आलेल्या अर्जांची छाननी केली असता, 52 हजार अर्जापैकी फक्त 16 हजार 590 फेरीवाल्यांना पात्र ठरवण्यात आले आहे.