मुंबई- राज्य सरकारच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. या बाबतचे परिपत्रक पालिकेच्या कामगार विभागाने प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. पालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर हा निर्णय अंमलात येणार आहे.
या परिपत्रकानुसार ज्या कर्मचाऱ्यांना पूर्वी दुसरा आणि चौथा आठवडा सुट्टीचा फायदा मिळत होता, अशाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे शनिवार आणि रविवार या दिवशी पालिकेचे मुख्यालय आणि इतर प्रशासकीय कार्यालये बंद राहणार आहे. रोटेशन पद्धतीने सुट्टी देणाऱ्या कार्यालयांचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी खाते प्रमुख, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या परवानगीने कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात याव्यात, असे या पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा -महिला दिन विशेष : जाणून घ्या फुटबॉलची 'दुर्गा' ओयनुम बेंबीम देवी यांच्याविषयी...