मुंबई -कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे देवनार येथील पशुवधगृह तीन महिने बंद होते. हे पशुवधगृह २ जुलैपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. त्यामुळे मांसाहारी नागरिकांचा मांस खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २ जुलैपासून देवनार पशुवधगृहाकडून मटण विक्रीचा परवाना देण्यात येणार असून ३ जुलैपासून पशुवध सुरू होणार आहे. मात्र, कामकाज सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच परवानगी रद्द करण्यात येईल, अशी माहिती देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांनी दिली.
मुंबईत लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर परवानाधारक मटण विक्रेत्यांना देवनार पशुवधगृहात जनावरे आणण्यासाठी मुख्य निरीक्षक विभागातून ‘पशु आयात’ परवाना देण्यात येणार आहे. हा परवाना ‘रविवार ते शनिवार’ असा सात दिवसांसाठी असेल. याचा वापर फक्त जनावरांची आयात आणि वध यासाठीच ग्राह्य धरण्यात येणार आहे. या परवान्यावर दिनांक, वेळ आणि वैधता कालावधीची नोंद असणार आहे. पशुवधानंतर निर्माण होणारे चामडे, चरबी, यकृत इत्यादींची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित परवानाधारकावर असणार आहे.
परवाना बंधनकारक -
परवानाधारकांना शेळ्या-मेढ्यांच्या वाहतूकीसाठी प्रतिदिवस फक्त ४० वाहनांना परवानगी असेल. पशु वधाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ७ अशी असेल. दर गुरुवारी पशुवधगृह बंद राहील. देवानार पशुवधगृहाचा परवान्यावर मुंबई शहरात इतरत्र कुठेही जनावरे घेऊन जाता येणार नाही. देवनार पशुवध गृहात कोणत्याही प्रकारचा बाजार भरवता येणार नाही. तसेच अन्य राज्यातील परवानाधारकांना बकरे खरेदी करण्यास बंदी असेल. या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला बकरा पशुवधगृहाबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. म्हैस, रेडे यांच्या प्रतिदिवस १५ तर वराहच्या ५ वाहनांना परवानगी असेल. परवाना घेतलेले वाहन येऊ शकत नसेल तर तसे मुख्य निरीक्षक विभागास कळवणे बंधनकारक असेल. कत्तल खान्यात परवानाधारक, कर्मचारी आदींनी सामाजिक अंतर राखणे, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज् वापरणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द केला जाणार आहे.
पशुवैद्यकीय तपासणी बंधनकारक -
पशुवधगृहात जनावरे आणल्यानंतर त्यांची पशुवैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. तपासणी झाल्यानंतर निरीक्षकांकडे त्यांची नोंद करणे व गोठा आकार भरणे गरजेचे आहे. सदर जनावराला २४ तास विश्रांती दिल्यानंतर पशुवधासाठी परवानगी देण्यात येईल. परवानाधारकांना दररोज शेळ्या-मेढ्यांनी भरलेली ४० वाहने, म्हैस, रेडे यांनी भरलेली १५ वाहने आणि 'वराह'ने भरलेली ५ वाहने आयात करण्यास परवानगी असेल.