मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालिकेचे आरोग्य, सफाई तसेच इतर कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या 24 जुलैपासून अँटीजेन टेस्ट पालिकेकडून केल्या जात आहेत. त्यात सोमवारी पालिकेचे 17 तर पोलीस विभागातील 35 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंत अँटिजेन टेस्टमध्ये पालिकेचे 42 तर पोलीस विभागातील 66 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना, मुंबईत स्वच्छता ठेवताना, मुंबईकरांना पाणीपुरावठा करताना, अन्न वाटप करताना पालिकेच्या 2 हजार 686 पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तर 108 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या टेस्ट करण्याची मागणी केली जात होती. महापालिकेच्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे अशा विभागातील पालिका आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत.
24 जुलै रोजी पालिका कर्मचाऱ्यांच्या 2 हजार 443 टेस्ट करण्यात आल्या. त्यात 16 कर्मचारी पॉझिटिव्ह तर 2 हजार 432 कर्मचारी निगेटिव्ह आले होते. शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी 27 जुलैला 2 हजार 180 पालिका कर्मचाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये 2 हजार 163 निगेटिव्ह आले आहेत तर 17 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 1 लक्षणे असलेला तर 16 लक्षणे नसलेले कर्मचारी आहेत.
मुंबई महापालिकेकडून आतापर्यंत 5 हजार 859 कर्मचाऱ्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात 5 हजार 817 कर्मचारी निगेटिव्ह तर 42 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 41 पॉझिटिव्ह पैकी 1 लक्षणे असलेला तर 41 लक्षणे नसलेले कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 हजार 817 निगेटिव्ह असलेले कर्मचारी आहेत.