मुंबई :पालिकेनं मानखुर्द तसंच दहिसर जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर बस डेपो, बिझनेस पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या योजनेनुसार लांब पल्ल्याच्या सर्व बसेस जकात नाक्यांवर थांबतील. यासाठी लवकरच निविदांसाठी परिपत्रक काढण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या बदलामुळं शहरातील वाहतुक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होणार असून, यातून अनेकांना रोजगार मिळेल, असा विश्वास पालिकेला आहे.
ट्रान्सपोर्ट हब होणार तयार :प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जकात नाक्यांच्या मोकळ्या जागेवर लांब पल्ल्याच्या बसेससाठी जागा देण्यात येणार आहे. चार्जिंगसह सीएनजी स्टेशन, पार्किंग, रेस्टॉरंट आदी सुविधा यात उपलब्ध होणार आहेत. सोबतच तिथंच चौकशी काउंटर, तिकीट बुकिंग काउंटर, लोकल ट्रेन, बस, मेट्रोसह इतर सार्वजनिक, खाजगी वाहतूक पर्यायांद्वारे ट्रान्सपोर्ट हब तयार केलं जाणार आहे.
पालिकेला मिळणार महसूल : मुंबई पालिका पर्यटकांसाठी वाजवी दरात ट्रान्झिट निवास उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. सोबतच नोकरी करणाऱ्या पुरुष, महिलांच्या वसतिगृहांसाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. याबाबत पालिका प्रशासनानं सांगितलं की, आम्ही सध्या स्वयं-शाश्वत विकास विकसित करण्याची योजना आखत आहेत. यातून पालिकेला महसूल देखील मिळेल. सर्व आधुनिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे, हे स्मार्ट कॉम्प्लेक्स असेल.