मुंबई:मुंबईमहापालिकेने (Mumbai Municipal Corporation ) गेल्या दोन ते तीन वर्षांत केलेल्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांचे कॅगद्वारे परीक्षण (CAG Audit) केले जात आहे. यासाठी कॅगची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे. एकूण पाच टीम असून एका टीममध्ये पाच अधिका-यांचा समावेश आहे. ऑडिट करताना पालिकेतील संबंधित कर्मचारी, अधिका-यांना उपस्थित राहावे लागणार आहे. बदली व निवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिका-यांनाही बोलावले जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ऑडिट पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान कॅगला पालिका प्रशासन सहकार्य करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
आर्थिक व्यवहारांची कॅगद्वारे चौकशी:(Investigation of financial transactions by CAG)मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. कोरोना दरम्यान करण्यात आलेल्या खर्चावर भाजपसह काँग्रेस आदी पक्षांनी प्रश्चचिन्ह उपस्थित केले होते. पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या अनेक प्रस्तावांवर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार केली जात असताना कोणतीही चौकशी केली जात नव्हती. यावरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी कॅगद्वारे चौकशी करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी पालिकेतील व्यवहारांची कॅग द्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती.
कॅगला सहकार्य करा:कॅगची टीम मुंबईत दाखल झाली आहे. कॅगची टीम मुंबई पालिकेत येण्यापूर्वी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिका अधिकारी, रुग्णालयांचे डीन तसेच जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख असलेले नोडल ऑफिसर यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत कॅगच्या टीमला सर्व सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालिका आयुक्तांसोबत कॅगच्या टीमने एक बैठकही घेतली आहे. पालिकेच्या रुग्णालयात, कोविड सेंटरच्या नोडल ऑफिसरकडे तसेच इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खर्चाचे ऑडिट सुरु करण्यात आले आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत कॅगची टीम ऑडिट पूर्ण करणार आहे. कॅगच्या पाच टीम असून प्रत्येक टीममध्ये पाच अधिकारी असणार आहेत. कोरोना काळात आर्थिक व्यवहार झाला त्यावेळी असलेल्या संबंधित खात्यातील अधिकारी, कर्मचा-यांनाही हजर राहण्यासाठी सांगितले जाणार आहे. यातील आता बदली झालेल्या शिवाय निवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिका-यांनाही बोलावले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
हे व्यवहार वादात:राज्य सरकारने कॅगला पाठविलेल्या प्रस्तावानुसार पालिकेत 28 नोव्हेंबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत विविध 10 विभागांमध्ये करण्यात आलेल्या 12 हजार 23 कोटी 88 लाख रुपये खर्चाच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने कोरोनाकाळात विविध बाबींवर खर्च झालेले 3538.73 कोटी, दहिसर येथे अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना पालिकेने केलेली खरेदी, चार पुलांच्या बांधकामावर झालेला 1496 कोटींचा खर्च, करोनाकाळात तीन रुग्णालयात करण्यात आलेली 904.84 कोटींची खरेदी, शहरातील 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवरील 2286.24 कोटींचा खर्च, सहा सांडपाणी प्रकल्पावरील 1084.61 कोटींचा खर्च, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील 1020.48 कोटींचा खर्च आदींचे लेखापरीक्षण करण्याची विनंती केली कॅगला करण्यात आली आहे.