मुंबई - पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडतात. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही हे खड्डे बुजवले जात नाहीत. मात्र, वरळीमधील खड्डे बुजवण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीमध्ये रॅली काढली. शिवसेनेच्या युवराजांना खड्ड्यांचा त्रास नको म्हणून ही रॅली ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गावरील खड्डे महानगरपालिकेने बुजवले.
मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. तरीही पावसाळ्यात पाणी तुंबणे, रस्त्यावर खड्डे पडणे अशा समस्या मुंबईत दरवर्षी निर्माण होतात. पाणी तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम होतो. काही वेळा मुंबई ठप्पही होते. मात्र, पालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.