मुंबई :बृहन्मुंबई महापालिकेच्या सचिव विभागात लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी विविध आरक्षणांतर्गत २७ जागा भरण्यात येणार असूना यासाठी पालिकेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या तरुणांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा आहे व ज्यांना लिखाण करायला व संगणकावर काम करायला आवडते अशा तरुणांनी यासाठी अर्ज करावेत असा आवाहन पालिकेकडून करण्यात आल आहे.
या विभागात भरती :अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज उपलब्ध झाले आहेत. सचिव विभागात कनिष्ठ लघुलेखक- वृत्तनिवेदक (इंग्रजी) आणि कनिष्ठ लघुलेखक वृत्तनिवेदक (मराठी) या पदाची भरती होणार आहे. सरळसेवेमधून ही भरती होत आहे. प्रवर्गनिहाय रिक्त पदे तसेच रिक्त होणारी पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणाऱ्या आणि अटींची पूर्तता करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील तसेच मागासवर्गातील इच्छूक उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
या प्रवर्गात आरक्षण : भरतातील २७ पदांपैकी ७ पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी २, अनुसूचित जमातीसाठी ३, विमुक्त जाती (अ) २, भटको जमात क, ब, ड प्रत्येकी एक पद भरण्यात येणार आहे. इतर मागासवर्गीय ७ तर आर्थिक दुर्बल घटकांसाठी ४ पदे राखीव आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn महानगरपालिकेच्या या अधिकृत वेबसाइटवर जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.