मुंबई- शहरातील खड्डे, आणि त्यामध्ये पावसाळ्यात पाणी तुंबणे यावर आरजे मलिष्काने गाणी बनवून मुंबई पालिकेवर टीका केली होती. त्यामुळे यंदा खुद्द आयुक्तांनी टीका करणाऱ्या मलिष्कालाच सोबत घेऊन नालेसफाई व इतर कामांचे सादरीकरण केले आहे. त्यामुळे आयुक्तांनीच मलिष्कापुढे पायघड्या घातल्याने सत्ताधारी शिवसेनेकडून आणि विरोधकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार जाहिरातबाजीवर चालला, असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. रेड एफ-एफ - ९३.५ ची आरजे मलिष्काने ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय’ आणि ‘मुंबई गेली खड्ड्यात', अशी गाणी तयार करून जागतिक दर्जा असणाऱया मुंबई महापालिकेची नाचक्की केली होती. त्यामुळे आता यंदा पुन्हा एखादे पालिकेवर गाणे यायला नको, म्हणून पालिकेने विकास कामांची माहिती देण्यासाठी मलिष्काला निमंत्रण दिले.
मलिष्का हिने तिचे सहकारी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्यासह वरळी येथील पालिकेचे लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन आणि पालिका मुख्यालयातील अपात्कालीन कक्षाला भेट दिली. यावेळी खुद्द पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, अश्विनी जोशी, आबासाहेब जर्हाड आदी अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी पावसापूर्वी केलेल्या कामाची माहिती मलिष्काला दिली.