महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : जलवाहिनी गळतीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदारावर १५ कोटींची खैरात - मुंबई महापालिका बातमी

मुंबईमधील अनेक जलवाहिन्या फुटतात आणि त्यांना गळती लागते. त्यात लाखो लीटर पाण्याची नासाडी होते. पालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने या जलवाहिन्यांची दुरुस्ती वेळेवर होत नाही. यासाठी ही कामे कंत्राटदारांकडून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

mumbai municipal Corporation has decided to carry out water works by contractors
मुंबई : जलवाहिनी गळतीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदारावर १५ कोटींची खैरात

By

Published : Mar 6, 2021, 9:49 AM IST

मुंबई - अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वे, रस्ता रुंदीकरण, एमएमआरडीए, म्हाडा, महानगर गॅस आदी प्राधिकरणांची विविध प्रकारची कामे सुरु असतात. या कामादरम्यान मुंबईमधील अनेक जलवाहिन्या फुटतात आणि त्यांना गळती लागते. त्यात लाखो लीटर पाण्याची नासाडी होते. पालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने या जलवाहिन्यांची दुरुस्ती वेळेवर होत नाही. यासाठी ही कामे कंत्राटदारांकडून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिका १५ कोटींचा खर्च करणार आहे.

चार कंत्राटदारांची नेमणूक -

मुंबईतल्या विविध कंपन्यांच्या कामादरम्यान भूमिगत ३०० मिमी व त्यापेक्षाही मोठ्या जलवाहिनी फुटण्याच्या अथवा त्या जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्याने त्यांना गळती लागण्याच्या घटना घडतात. त्यासाठी पालिका शहर, पूर्व उपनगर-नगरबाह्य, पश्चिम उपनगर, पश्चिम उपनगर-दक्षिण विभाग या ठिकाणी चार कंत्राटदारांची नेमणूक करणार आहे. त्यासाठी या कंत्राटदारांवर पालिका १४.५३ कोटी रुपयांची खैरात करणार आहे. त्यातही एकाच कंत्राटदाराला दोन ठिकाणची मिळून ७.४५ कोटी रुपयांची कामे देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावांना आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहर विभागात मे.डी.बी. इन्फ्राटेक कंत्राटदाराला ३.६४ कोटी रुपयांचे कंत्राट, पश्चिम उपनगर-दक्षिण विभागात मे.सी.एन. लिधानी इंटरप्रायजेस या कंत्राटदाराला ३.४३ कोटी रुपयांचे, तर पश्चिम उपनगरात मे.ऍक्युट डिझाईन्स या कंत्राटदाराला ३.५९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. मे.ऍक्युट डिझाईन्स या कंत्राटदाराला पूर्व उपनगर-नगरबाह्य विभागात (ठाणे हद्दीत) ३.८६ कोटी रुपयांचे असे एकूण १४.५३ कोटी रुपयांचे कंत्राटी काम देण्यात आले आहे.

३२ ते ३९ टक्के कमी दरात काम-

भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी या चारही प्रस्तावात या कंत्राटदारांनी किमान ३२ ते ३९ टक्के कमी दरात कंत्राटकाम करण्याची तयारी दर्शवल्याने जोरदार आक्षेप घेतला. एवढ्या कमी दरात कंत्राटदार उत्तम दर्जाची कामे कशी करणार, अशी शंका उपस्थित केली.

दर्जाबाबत तडजोड नाही -

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, जरी कमी दरात कंत्राटदार काम करणार असेल, तरी कामाच्या दर्जाबाबत पालिका कोणतीही तडजोड करणार नाही. कामाचा दर्जा राखला जाईल. या कामांवर पालिकेकडून लक्ष देण्यात येईल. कंत्राटदाराने कामे समाधानकारक केल्याची खात्री झाल्यावर त्याला कंत्राट रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

हेही वाचा - दोन कुटुंबासाठी सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नका; शशिकांत शिंदेंचा कृषी कायद्याला विरोध

ABOUT THE AUTHOR

...view details