मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस मिळण्यात अडचणी येत आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने लस विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहेत. परंतु त्याची मुदत आज संपल्याने पुन्हा एका आठवड्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. आता २५ मेपर्यंत ही मुदत वाढवल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
ग्लोबल टेंडरची मुदत एक आठवड्याने वाढवली -
मुंबईला ज्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे, त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने नागरिकांना लस मिळताना अडचणी येत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने एक कोटी डोससाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. १८ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत महापालिकेकडे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करावयाचे होते. आजच दुपारी ३ वाजता हे प्रस्ताव उघडण्यात येणार होते. जर महानगरपालिकेने कार्यादेश दिला, तर तीन आठवड्यांच्या आत संपूर्ण लससाठा संबंधित कंपन्यांना पुरवावा लागेल, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने स्वारस्य कळवण्यासाठी एका आठवड्याची म्हणजेच २५ मेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.