मुंबई -पंजाब महाराष्ट्र बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यावर खासगी आणि सहकारी बँकेवरील ग्राहकांचा विश्वास उडाला आहे. मात्र श्रीमंत अशा मुंबई महापालिकेने जास्त व्याज मिळण्याच्या लालसे पोटी करोडो रुपये खासगी बँकांमध्ये ठेवी स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे संबोधले जाते. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अनेक छोट्या राज्यांपेक्षा मोठा आहे. महापालिकेच्या विविध बँकांमध्ये 79 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींवर पालिकेला 4500 कोटी रुपयांचे व्याज मिळते. पालिकेच्या अर्थसंकल्पातील खर्च न झालेला निधी, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, कंत्राटदारांकडून घेण्यात आलेली सुरक्षा रक्कम, आदी रक्कम विविध बँकांमध्ये ठेवली जाते.