मुंबई - जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. या मुंबईत लाखो वाहने रस्त्यावर धावत असतात. तसेच हजारो वाहने रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने स्वतःचे बहुमजली पार्किंग सुरु केले आहे. बेवारस रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या जप्त करून ठेवता याव्यात यासाठी तीन ठिकाणी जागा निश्चित केल्या जात आहेत. तसेच ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ स्थापन केले आहे. त्याद्वारे स्थानिक पातळीवर समस्या समजून त्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच इमारतींचा पुनर्विकास करताना वाहन पार्किंगची सुविधा निर्माण करून देण्यात याव्यात, अशा सूचना बिल्डरांना देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पालिकेची वाहनतळे, स्ट्रीट पार्किंग -
मुंबईत नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. मुंबईत सुमारे २० लाखांहून अधिक वाहने आहेत. रस्ते मार्गाने मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी तब्बल तीन तासांचा कालावधी लागतो. मुंबईमधील बहुतेक ठिकाणी रस्त्यावर मिळेल त्या जागेवर वाहने पार्किंग केली जातात. परिणामी वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या मुंबईत गंभीर झाली आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने बिल्डरांकडून मिळालेल्या 29 भूखंडांवर बहुमजली पार्किंग व्यवस्था सुरु केली आहे. या ठिकाणी सुमारे ३० हजार वाहने उभी करता येऊ शकतात. या पार्किंगच्या परिसरात बेकायदेशीर वाहने पार्किंग केल्यास त्यावर १ ते १० हजार रुपयांचा दंड आकाराला जातो. मात्र, याला स्थानिक नागरिकांचा विरोध झाला होता. यामुळे पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या जुन्या इमारतीत पार्किंग नसलेल्या रहिवाशांना स्ट्रीट पार्किंग योजनेखाली जास्तीत जास्त सहा महिन्यांचा सशुल्क पास देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत रहिवाशांना सहा महिन्यांचे डिपॉझिट भरणे बंधनकारक आहे.
गाडीच्या सुरक्षेची जबाबदारी वाहन मालकाची
डिपॉझिट जमा केल्यावर रहिवाशांना त्यांच्या गाडीचा क्रमांक असलेला पास देण्यात येणार आहे. अशा रहिवाशांना पालिकेने त्यांच्या इमारतीजवळ निश्चित केलेल्या जागेवर गाडी पार्क करता येणार आहे. या गाड्या रस्त्याच्या एकाच बाजूला उभ्या करता येणार आहेत. मात्र, अशा पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या गाडीच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही वाहन मालकाची असणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ स्थापन -
मुंबई महापालिकेने ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ (एमपीए) स्थापन केले आहे. त्या माध्यमातून वाहनतळ विकेंद्रीकरण साधण्यासाठी निर्णय घेतला आहे. पालिका स्तरावर मुंबईत २२७ विभाग आहेत. त्यात गाड्या पार्किंग करण्यासाठी उपलब्ध जागा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, हे पाहिले जाईल. त्यात दुचाकी तिनचाकी, चारचाकी, बस, छोटी-मोठी खासगी-सार्वजनिक वाहने यांचा समावेश आहे. मुंबई शहरासाठी स्वतंत्र वाहनतळ प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे सल्लागार निवृत्त सनदी अधिकारी डॉ. रामनाथ झा हे आहेत. आपण स्वतः प्राधिकरणाचे प्रमुख असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.