मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबई हॉटस्पॉट बनली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असले तरी मुंबई महापालिकेला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या ४ महिन्यात फक्त ८६ कोटींचीच मदत मिळाली आहे. विशेष म्हणजे या लढ्यात पालिकेला जी रक्कम मिळाली त्यात मुंबई शहर जिल्हा अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिकेला मिळाले फक्त ८६ कोटी रुपये; माहिती अधिकारात उघड - कोरोनासाठी निधी मुंबई बातमी
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पालिकेला गेल्या चार महिन्यांत अवघ्या ८६ कोटींची मदत मिळाली आहे. या निधीचा सर्वाधिक वाटा मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. एकूण जमा रक्कमेपैकी ८४ टक्के रक्कम त्यांनी दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कोविड १९ म्हणजेच कोरोना दरम्यान मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या निधीची माहिती मागवली होती. मुंबई पालिकेच्या वित्त विभागाने अनिल गलगली यांना मिळालेल्या निधीची माहिती दिली. त्यानुसार गेल्या ४ महिन्यात मुंबई पालिकेला कोविड १९ साठी एकूण ८६ कोटी ५ लाख ३० हजार ३०३ रुपये मदत म्हणून मिळाले आहेत. या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी ७२.४५ कोटी रुपये दिले आहेत. ही सर्वात मोठी रक्कम आहे आणि प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी ८४ टक्के आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकार्यांनी ११.४५ कोटी दिले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने ५० लाख रुपये दिले आहेत. खासगी लोकांनी ३५.३२ लाख रुपयांची मदत केली असून आमदारांकडून केवळ १.२९ कोटी निधीमध्ये जमा झाले आहेत. यामध्ये केवळ ७ आमदारांचा समावेश आहे.
कोविड १९ अन्वये मुंबई पालिकेने ८ हजार ७०० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. ना केंद्र सरकारने मुंबई पालिकेला सहाय्य केले, ना मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून कोणतीही मदत प्राप्त झाली. मुंबई मनपाच्या तिजोरीत कोविड १९ साठी पैसे उभे करण्यासाठी आयुक्त, महापौर, आयएएस अधिकारी आणि नगरसेवकांनी कोणतीही पुढाकार घेतलेला नसल्याची बाब गलगली यांनी नमूद केली. दरम्यान, मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि पालिकेसह राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा कामाला लागली. त्यावेळी खासगी संस्थांनीही मदतीसाठी हात पुढे केला. परंतु, मार्च महिन्यांच्या तुलनेत आता मदतीचा ओघ कमी झाला आहे. पालिका प्रशासन मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी झटत असून अजुनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे पालिकेला मदत करण्याबरोबरच योग्य ती काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.