मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच इकबाल चहल यांनी नायर रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत काहीही अडचणी आल्यास थेट 'मला संपर्क साधा' असे आवाहन आयुक्तांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केले आहे. पालिका आयुक्तांच्या या भेटीमुळे आणि केलेल्या आवाहनामुळे पालिका प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचा संदेश पालिका कर्मचाऱ्यांमध्ये गेला असून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
पदभार स्विकारताच मुंबईच्या पालिका आयुक्तांनी नायर रुग्णालयाला दिली भेट, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी साधला संवाद - मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल
आयुक्त चहल यांनी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची आणि देण्यात आलेल्या सोयी सुविधांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी आयसीयूलाही भेट दिली. या भेटीदरम्यान पालिका आयुक्तांनी रुग्णांशीही संवाद साधला.
मुंबईतील कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा गेल्या 2 महिन्यात 12 हजारांपर्यंत गेला आहे. तर मृतांचा आकडा 462 वर पोहचला आहे. रुग्णांचा आकडा वाढत असल्याने महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सायन रुग्णालयात कोरोनाच्या मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. रुग्णालय कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने मिळत नसल्याने कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकारही उघडकीस आले होते. कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढत असल्याने राज्य सरकारने महानगरपालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करत इकबाल चहल यांची पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. चहल यांनी शुक्रवारी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारताच आज पालिकेच्या रुग्णालयाला भेटी देण्यास सुरुवात केली आहे.