मुंबई -महापालिकेच्या मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक 141 मधील नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे आज (गुरुवारी) पोटनिवडणूक झाली. यात ४२ टक्के मतदान झाले असून, 32 हजार 86 मतदारांपैकी एकूण 13 हजार 476 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2017 ला पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागात 56 टक्के मतदान झाले होते. मात्र, पोटनिवडणुकीत 14 टक्के मतांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे.
पोटनिवडणुकीमध्ये एकूण 18 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, उद्या शुक्रवारी निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. अत्यंत चुरशीच्या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुंबई महापालिकेच्या 2017 ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 141 मधून काँग्रेसच्या तिकीटावर विठ्ठल लोकरे निवडून आले होते. लोकरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या रिक्त जागेवर गुरुवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. दुपारी दीड वाजेपर्यंत 25.26 टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत 32.73 टक्के मतदान झाले. दुपारी साडेबारानंतर मतदारांची गर्दी काहीशी ओसरली होती. दुपारी साडेतीन नंतर मतदारांनी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली. त्यामुळे साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे मतदानाची वेळ संपेपर्यंत 42 टक्के मतदान झाले. एकूण 13 हजार 476 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 7344 पुरुष तर 6132 महिलांनी मतदान केले.