मुंबई -देशातील पहिली मोनोरेल म्हणून ओळख असलेले मुंबईची मोनोरेल सात महिन्यांनी आज पुन्हा सुरू झाली. सकाळी साडेसात वाजता पहिली मोनोरेल चेंबूर ते किंग सर्कल या मार्गावर धावली. सात महिन्यांनंतर सुरू झालेल्या मोनोरेलचे प्रवाशांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अद्यार मुभा नाही. मात्र, मोनोरेलमधून सर्वच प्रवाशांना परवानगी मिळाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून मुंबईत मोनोरेल सेवा बंद ठेवण्यात आली होती. आज मोनोरेल प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेत प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांचे तापमान मोजण्यासाठीची यंत्रणा राबवण्यात आली आहे. प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी मोनोरेल प्रशासनाकडून ठिकठिकाणी सॅनिटायझर आणि इतर रसायनांचा वापरकरून स्वच्छताही राखली जात आहे.