मुंबई - मुंबईत गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे आयसीयू व्हेंटिलेटरची कमतरता भासत असल्याने पालिका प्रशासनाने चायनीज कंपनीकडून 16 कोटी 17 लाख रुपये खर्चून 100 व्हेंटिलेटर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, महापालिका रुग्णालय व कोविड सेंटरसाठी 3 हजार बेड खरेदी केले जाणार आहेत. या दोन्ही प्रस्तावाला काल स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा -13 जूनपर्यंत शाळा-शिक्षकांना सुट्टी, मात्र मुंबईतील शिक्षक ऑनड्युटी?
3 हजार बेड, 100 व्हेंटिलेटर
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या वर्षी फेब्रुवारीपासून मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली. यामुळे ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर कमी पडू लागली. नागरिकांना बेड मिळत नसल्याने वणवण फिरावे लागले. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड कमी पडू लागले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार 3 हजार साधे फोल्डिंग करता येतील असे बेड, तसेच 100 व्हेंटिलेटर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. पालिका रुग्णालय व कोविड सेंटर आदी ठिकाणी हे बेड आणि व्हेंटिलेटरचा वापर केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.