मुंबई -भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटनांमध्ये तसेच इमारती, घरे कोसळून शेकडो लोकांचे बळी जातात. ही जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिका दुर्घटना घडण्याची संभाव्य ठिकाणे आणि आग लागू शकते अशा संभाव्य ठिकाणांचे 'हजार्ड मॅपिंग' म्हणजेच सर्व्हे करणार आहे. तसेच अशा विभागांमधील नागरिकांना इतर लोकांचा जीव कसा वाचवता येईल, याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सर्व्हे करून यादी, अहवाल जतन केला जाणार -
मुंबईत दरवर्षी आगी लागण्याच्या हजारो घटना घडतात. काही ठिकाणी इमारती कोसळतात तर, काही ठिकाणी घरांवर दरडी कोसळतात. कोसळणाऱ्या बहुतेक इमारती या धोकादायक झालेल्या असतात. अशा विभागाचा व इमारतींचा सर्व्हे करण्याचे आदेश पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. ज्याठिकाणी आगी लागण्याच्या तसेच घरे, इमारती आणि दरडी कोसळण्याची शक्यता आहे, त्याची यादी व अहवाल बनवून पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात जतन केला जाणार आहे. यामुळे कोणती दुर्घटना घडल्यास त्याविभागाची इत्यंभूत माहिती पालिकेकडे आणि अग्निशमन दलाकडे असणार आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी त्वरित मदतकार्य पोहचवणे शक्य होणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
जीव वाचवण्याचे नागरिकांना प्रशिक्षण -
आग लागल्यावर तसेच घरे, इमारती, दरडी कोसळल्यावर त्यात अनेक जण अडकून पडतात. काही लोकांना आपला प्राणही गमवावा लागतो. अशा लोकांना आगीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचे, एखादी इमारत, दरड, घर कोसळल्यावर त्यात अडकलेल्या लोकांची सुटका कशी करावी, याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचेपर्यंत अडकलेल्या लोकांचा इतर स्थानिक जीव वाचवू शकतील, असे काकाणी यांनी सांगितले. सध्या कोरोनाच्या कामात पालिका कर्मचारी व्यग्र आहेत. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर हा सर्व्हे करून नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.