मुंबई -डीएन नगर ते मंडाले कुर्ला दरम्यान सुरू असलेले मेट्रो 2 बीचे काम संथ गतीने होत आहे. या मेट्रोचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कंपनीने पगार दिला नाही तर, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
चेंबूरच्या डायमंड गार्डन ते डीएन नगर मेट्रो लाईनचे काम संथ गतीने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. यासाठी वेगवेगळ्या बांधकाम कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. यातीलच 'राधा कन्स्ट्रक्शन कंपनी'(आरसीसी)ला डीएन नगर ते चेंबूर डायमंड गार्डन या 3 किलोमीटर मेट्रो मार्गाचे कंत्राट दिले आहे. मात्र, कंत्राटदाराने संथ गतीने काम केल्यामुळे आत्तापर्यंत या मार्गावरील केवळ तीन टक्केच काम पूर्ण झाले आहे. परिणामी एमएमआरडीएने (महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड) आरसीसीचे कंत्राट रद्द केले.
हेही वाचा -मुंबईच्या पोरांनी जिंकला 'अमेरिका गॉट टॅलेंट'चा किताब
याच दरम्यान आरसीसी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन कंपनी प्रशासनाने रखडून ठेवले आहे. यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तरेही दिली जात नाहीत. एमएमआरडीएने कंत्राट रद्द केल्याने आरसीसीचे बीकेसी आणि मंडाले येथील कास्टिंग यार्ड कार्यालय बंद झाले आहे. त्यामुळे हे कर्मचारी उघड्यावर आले आहेत. कंपनी व्यवस्थापनाने सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर द्यावे अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा संतप्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सहा महिन्यांपासून काम पूर्णतः बंद असल्यामुळे येथील लोखंडी साहित्य आणि विविध उपकरणे धूळ खात पडली आहेत. डीएन नगर ते चेंबूर डायमंड गार्डनदरम्यान मेट्रोसाठी रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत. या बॅरिकेट्सच्या आतमध्ये दारुडे जाऊन बसतात. काही ठिकाणी या बॅरिकेट्सच्या मधल्या जागेतून नागरिक रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत.