मुंबई: मुंबईत उपनगरात विशेष करून पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम असते. नागरिकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून प्रवास करत नियोजित स्थळी पोहचावे लागते. यामुळे प्रदूषणही निर्माण होते. यासाठी मुंबईत प्रदूषण न करणाऱ्या बस बेस्टने रस्त्यावर उतरल्या आहेत. तसेच नव्या दोन मेट्रो लाईन सुरू झाल्या आहेत. याचे लोकार्पण नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
अक्षय कुमार मेट्रोत :नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मेट्रोमधून प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांनी प्रवास केला आहे. अंधेरी पूर्व ते ओशिवरा स्टेशन दरम्यान त्यांनी हा प्रवास केला. अक्षय कुमार यांनी मेट्रोने प्रवास केल्याचे काही फोटो मेट्रोने ट्विट केले आहेत. मुंबईतील ट्रॅफिकमुळे अक्षय कुमार यांनी मेट्रोने प्रवास केल्याचे या ट्विट मध्ये म्हटले आहे. आम्ही प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि त्यांच्या सोयीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात वचनबद्ध असल्याचे मेट्रोने म्हटले आहे.
२०१९ मध्येही असाच प्रवास:सप्टेंबर २०१९ मध्ये अक्षय कुमार यांचे शूटिंग घाटकोपर येथे सुरू होते. शूटिंग संपवून अक्षय कुमार यांना वर्सोवाला पोहोचायचे होते. परंतु गाडीने प्रवास केल्यास त्यासाठी दोन तासाहुन अधिक वेळ लागणार होता. अक्षय यांच्या दिग्दर्शकांनी मेट्रोने २० मिनिटात पोहचू असे सांगितल्यावर ,त्यांनी मेट्रोने प्रवास केला होता. या प्रवासानंतर अक्षय कुमार यांनी मेट्रोने प्रवासाचा अनुभव आणि आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.