मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. (Mumbai measles cases outbreak). पालिकेच्या २४ पैकी १६ विभागात गोवरचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण ४३२ रुग्णांची तर ४७२८ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवर मुळे आतापर्यंत १४ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ११ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. सध्या २१ रुग्ण ऑक्सीजनवर, २ रुग्ण आयसीयुमध्ये तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Mumbai measles cases outbreak update)
२१ रुग्ण ऑक्सीजनवर, १ व्हेंटिलेटरवर :मुंबईत ७२ लाख ३५ हजार ८०५ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४७२८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ४३२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १२१ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १४९ जनरल बेडपैकी ९८, १४६ ऑक्सीजन बेड पैकी २१, ३५ आयसीयु बेडपैकी २ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात २० हजार ९७५ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या १ लाख ८८ हजार ०१३ मुलांपैकी १७,८८४ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ महिने पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ३५६९ बालकांपैकी ७९२ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे.