मुंबई - महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख राहत असलेल्या मातोश्रीचा म्हणजेच वांद्रे पूर्व विभाग त्यांनी निवडल्याची चर्चा आहे. यासाठीच निवडणुकीपूर्वी या विभागातील कामांवर महापौरांनी लक्ष केंद्रित केले आहे.
याचाच एक भाग म्हणून तब्बल २७ रस्त्यांची काम केली जाणार आहेत. तसे प्रस्ताव पालिकेच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. याबाबात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र ही विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे स्पष्ट बोलण्याचे टाळले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुंबईमधील अनेक नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी आपल्या विभागातील नागरी विकासाची कामे करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात आहे. याला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरही अपवाद राहिलेले नाहीत.
वाकोला येथील नगरसेवक असलेले विश्वनाथ महाडेश्वर २०१७ मध्ये मुंबईचे महापौर झाले. येत्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या महापौर पदाचा कालावधी संपत आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. महापौर झाल्यापासून त्यांची कामगिरी चांगली राहिल्याने 'मातोश्री' महाडेश्वर यांच्यावर खुश आहे. यामुळे, महाडेश्वर यांना विधानसभेचे तिकीट नक्की मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.