मुंबई -राज्यात आणि मुंबईत प्लास्टिक बंदी लागू आहे. पालिकेच्या उद्यान विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित विशेष पाहुण्यांसमोर प्लॅस्टिकच्या बाटल्या ठेवल्याने महापौरांनी संताप व्यक्त केला आहे. पुन्हा अशा प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरु नयेत असे आदेश आता किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
प्लास्टिक बॉटल्समुळे महापौर भर कार्यक्रमात संतापल्या - प्लास्टीक बंदी
शुक्रवारी पालिकेच्या उद्यान विभागाकडून फुले आणि झाडांच्या प्रदर्शनाचे उदघाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महापौर, उप महापौर, समिती अध्यक्ष, नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते.
राज्यात 23 जून 2018 पासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून कसोशीने केली जात आहे. त्यामुळे महापौरांनी आपले कार्यालय आणि बंगल्यामधून प्लास्टिक बाटल्या हद्दपार केल्या आहेत. पालिका आयुक्तांनीही सर्व कार्यालयात प्लास्टिक बाटल्यांऐवजी काचेचे ग्लास वापरण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी आजही केली जात नाही. शुक्रवारी पालिकेच्या उद्यान विभागाकडून फुले आणि झाडांच्या प्रदर्शनाचे उदघाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महापौर, उप महापौर, समिती अध्यक्ष, नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान महापौरांचे भाषण संपल्यावर आपल्या समोरील टेबलवर प्लॅस्टिकच्या बॉटल्स त्यांच्या निदर्शनास आल्या. यामुळे महापौरांनी संताप व्यक्त करत टेबलावरील प्लॅस्टिकच्या बॉटल्स हटवण्याचे तसेच पुन्हा पालिकेच्या कोणत्याही कार्यक्रमात प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर करू नये असे आदेश प्रशासनाला दिले.
"आपण जगभरात पर्यावरणाचा ऱ्हास होताना पाहत आहोत. त्यात मोठा वाटा प्लस्टिकचा आहे. प्लास्टिक हानिकारक असेल तर त्याचा वापर आपण टाळला पाहिजे. प्लॅस्टिकऐवजी ज्याची व्हिलेवाट योग्य प्रकारे होऊ शकते अशा वस्तूंचा वापर केला पाहिजे. आजही प्लॅस्टिकच्या वापर केला जात असल्याने आयुक्तांच्या माध्यमातून पुन्हा प्लॅस्टिक बॉटल बंद करण्याबाबत पालिका कार्यालयाना आदेश द्यावे लागतील. माजी आणि आजी पर्यावरण मंत्री प्लॅस्टिक बंदीवर ठाम आहेत. त्यामुळे आता पालिका आणि सरकारी कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक बॉटल ऐवजी काचेच्या किंवा विल्हेवाट लावता येतील अशा पेपपरच्या बॉटल्स वापरल्या पाहिजेत, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.