मुंबई - जागतिक दर्जाची मुंबई सुरक्षित नसल्याचा आरोप अनेक वेळा केला जातो. याच शहरात शक्ती मिल सारखे बलात्काराचे प्रकरण घडले आहे. यामुळे महिला आणि नागरिकांमध्ये निर्जनस्थळी जाताना भीतीचे वातावरण असते. ही भीती दूर व्हावी म्हणून येथील निर्जन स्थळे खुली करून त्याठिकाणी लोकांची वर्दळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
महापौर परिषद सुरु करण्यासाठी सर्व पक्षियांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा -...त्यामुळे नेते नाराज तर होणारच; छगन भुजबळांनी दिले स्पष्टीकरण
पेडणेकर पुढे म्हणाल्या, मुंबईत अनेक निर्जन स्थळे आहेत. त्याठिकाणी महिला आणि नागरिक जाण्यास घाबरतात. महालक्ष्मी येथील शक्तीमिलमध्ये एका युवतीवर बलात्कार झाला होता. त्यामुळे निर्जन स्थळे सुरक्षित करण्याची मागणी गेले अनेक वर्षांपासून केली जात होती. याची दखल महापौरांनी घेतली आहे. येथील निर्जन स्थळाची माहिती मागवण्यात आली आहे. अशा स्थळांना भेटी देऊन ती खुली करण्यासाठी तसेच अशा ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढवता यावी, म्हणून संबंधित यंत्रणांची बैठक घेणार असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. सुरक्षित मुंबईबरोबरच स्वच्छ मुंबई आणि चांगले रस्ते देण्याचा संकल्पही आपण नवीन वर्षासाठी केला असल्याचे त्यांनी सांगितले.