मुंबई - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर राणीबागेत कामात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar on Ranibag Work ) यांनी केला आहे. हे विरोधक कमी असून वैरी जास्त आहेत असा टोला लगावत मूळव्याधीसारखी यांची वृत्ती असेल तर ती आम्ही नीट करू शकत नाही, असे महापौर ( Kishori Pednekar Criticized Bjp ) म्हणाल्या.
विरोधक कमी वैरी जास्त -
भाजपाकडून राणीबागेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खुलासा केला आहे. यावेळी बोलताना विदेशी प्राण्यांसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल अंतर्गत १० एकरच्या जागेत अधिवास आणि पर्यटकांना सुद्धा तिथे येता येईल यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. २०१८ चे शेड्युल रेट होते त्यानुसार आम्ही काम दिले होते. ९१.४२ कोटी, आणि ९४.२२ कोटीच्या शेड्युल रेट नुसार निविदा होती. भ्रष्टाचार झाला तर तो सिद्ध करून दाखवा. कोणतीही व्यक्ती असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये वाटेल ते आरोप करू नका. हे विरोधक कमी वैरी जास्त दिसतायेत असा टोला महापौरांनी दिला. तुम्ही परदेशातील कंपन्यांना आणा आणि या खर्चात हे प्रकल्प करून दाखवा असे खुले आव्हान भाजपाला महापौरांनी दिले.
हत्तीला चंपा तर चिंपाजीला चिवा नाव -
सध्या थेट आरोप करण्याच्या सुपाऱ्या घेतल्या जात आहेत. राणीबागेत विदेशी प्राणी पक्षी येणार आहेत. १०० रुपयात आम्ही राणीबाग दाखवणार आहोत. राणीबागेतील पेंग्विनचा वार्षिक खर्च ५ कोटी आहे तर पेंग्विन कक्ष तयार करण्यासाठी १७.५० कोटी आहे. गुजरातमध्ये पेंग्विन पार्क गुजरात सायन्स सोसायटीमध्ये सुरू केले. त्यासाठी २६४ कोटी खर्च झाले. तिथे लोकांच्या पशांचा विनयोग झाला का असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला. प्राणी आणि पक्षांची नावे इंग्रजीमध्ये देण्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना उद्यानातील प्राण्यांना आता आम्ही शुध्द मराठी नाव देण्याचं ठरवलं आहे. हत्तीला चंपा तर चिंपाजीला चिवा नाव देणार आहोत. मूळव्यधी सारखी तुमची वृत्ती असेल तर ती आम्ही नीट करू शकत नाही असे सांगत जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत वीर जिजामाता भोसले उद्यान हे नाव कदापी बदलणार नाही, तसे कोणीही धाडस करू शकणार नाही असे महापौर म्हणाल्या.