मुंबई - कोरोनाच्या प्रसारामुळे राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन येत्या सोमवारी म्हणजेच 7 जूनपासून 5 स्तरांत हटवण्यात येणार आहे. मात्र, मुंबई पहिल्या की स्तरांत आहे, याची स्पष्टता नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यावर मुंबई तिसऱ्या स्तरांत असल्याचे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. यामुळे सरकारने तिसऱ्या स्तरासाठी जाहीर केलेले नियम मुंबईला लागू असणार आहेत.
मुंबईबाबत होती संभ्रमावस्था -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने राज्य सरकारकडून अनलॉक करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. "मिशन बिगिन अगेन"अंतर्गत राज्यातील निर्बंधासाठी स्तर निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आला आहे. तीन जूनला आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र, हा निर्णय विचाराधीन असल्याचे सांगत राज्य सरकारकडून त्यांच्या घोषणेला बगल देण्यात आली. यानंतर ४ जूनला रात्री उशिरा अधिसूचना काढत राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली आहे. राज्यात पाच स्तरांत अनलॉक करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईतही ७ जूनपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ टक्के तर मुंबईमधील १२.५१ टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास मुंबई पॉझिटिव्हिटी रेटनुसार तिसऱ्या तर ऑक्सिजन बेडच्या आकडेवारीनुसार पहिल्या स्तरात आहे. यामुळे संभ्रमावस्था दिसत होती.
मुंबई तिसऱ्या स्तरात -
राज्य सरकारने अनलॉकबाबत निर्णय घेतला आहे. सरकारने जाहिर केलेल्या मुंबईत ५.५६ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर १२.५१ टक्के ऑक्सिजनच्या खाटा भरलेल्या आहेत. यामुळे मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. शहरात कोणते व्यवहार सुरू राहतील, कोणते व्यवहार बंद राहतील, याबाबतचे परिपत्रक आज संध्याकाळपर्यंत काढले जाईल, असे महापौरांनी सांगितले. रेल्वेमधून सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकार घेईल, असे महापौरांनी सांगितले.