मुंबई -14 सप्टेंबरला दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख याचा थेट संबंध मुंबईशी होता. जान मोहम्मद शेख हा मुंबईतील धारावी परिसरामधील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून आता चौकशीमध्ये मोठे खुलासे होत असून दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई असल्याचे समोर आले आहे. मुंबईत मोठा घातपात घडवण्याचा कट दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आले. खास करून या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे.
रेल्वे प्रशासन अलर्ट -
मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गर्दी असलेल्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये विषारी गॅस सोडून अधिकाधिक लोकांना मारण्याचा कट दहशतवाद्यांकडून रचला जात होता. या कटासाठी काही स्टेशनची रेकी केली गेली होती का? याबाबत देखील आता तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. गुप्तचर विभागाकडून याबाबत रेल्वे प्रशासनाला अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबईतील अनेक स्टेशनवर आता सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईमधील महत्त्वाच्या स्टेशनवर आत आणि बाहेर जाणाऱ्या मार्गांवर सुरक्षाव्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून वाढवण्यात आल्या आहेत.