मुंबई - लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास 50 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच कार्यालयात बोलवा असे सांगण्यात आले आहे. सरकारी कार्यालयातही 50 टक्क्यांपेक्षी कमी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन सार्वजनिक वाहतूक सेवेवर ताण कमी पडावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे मह्त्तावाचे निर्णय घेत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा -गर्दी टाळा.. अतिमहत्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही तर बस आणि ट्रेन सेवा 10 ते 12 दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात आतापर्यंत 42 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. जवळपास 800 टेस्ट झाल्या असून त्यापैकी 42 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांची चाचणी केली जात आहे. तसेच राज्यात आणखी काही लॅब, हॉस्पिटल सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -Coronavirus : 'कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेट्रो स्थानक आणि गाड्यांची साफसफाई सुरू
टोपे म्हणाले की, मी आज (बुधवार) पुण्यातील नायडू हॉस्पिटलला भेट देवून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. काल (मंगळवार) नागपूरमध्ये काही किट कमी पडले, केंद्राने किट पुरवणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा बंद करणार नसल्याचेही टोपे म्हणाले. अत्यावश्यक सेवा कुठल्याही परिस्थितीत बंद करणार नाही. परंतू अनावश्यक व्यवहार बंद करायला हवेत. पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांसारखी सारखी दुकानं बंद ठेवण्याचे सांगण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.