मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्य सरकारने संचारबंदीची घोषणा केेली आहे. या संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवागनी देण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसात लोकलमधील प्रवासी संख्या 5 लाखाने घटली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 2 लाख 65 हजार, तर मध्य रेल्वे मार्गावर सुमारे 2 लाखांनी प्रवासी संख्या कमी झाली आहे.
लोकलमध्ये शुकशुकाट-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना 'ब्रेक द चेन' निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करताना दिसून येत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी प्रवाशांची वर्दळ दिसून येते. मात्र, दुपारी आणि रात्रीच्या सुमारास स्थानकावर फक्त लोकलचे भोंगे आणि उद्घोषणेचा आवाज कानावर पडतो. स्थानकातील जिने, सरकते जिने, तिकिट खिडक्या, स्वच्छतागृहे रिकामे दिसून येत आहेत. अनेक स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा पहारा असल्याचे दिसून येत आहे.
लोकल प्रवाशांची संख्या रोडावली-
शासकीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थिती, तर खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार गर्दीच्या दिवशी देखील लोकलमधील प्रवाशांची संख्या रोडावत आहे. मात्र, राज्य सरकारने विकेंड लाॅकडाॅऊन लावल्यामुळे अनेक प्रवाशांनी लोकल प्रवास टाळला. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी प्रतिदिन सुमारे 4 लाख प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वे मार्गावर शुक्रवारी 2 लाख 50 हजार प्रवासी संख्या होती. मात्र, राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा लोकल प्रवाशांची संख्या रोडावली आहे.