मुंबई Mumbai Local Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज (15 ऑक्टोबर) मोठा मेगाब्लॉक आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासंदर्भात विविध अभियांत्रिकी कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. विशेषतः मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गे केवळ हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या कल्याण पासून ते ठाण्यापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मध्यरात्री एक ते चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. रविवारच्या या मेगाब्लॉक देखभाल दुरुस्तीमुळं छत्रपती शिवाजी टर्मिनलकडं आणि कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांचे मार्गदेखील वळवण्यात आलेले आहेत.
'हे' मार्ग राहतील बंद : ठाणे कल्याण रेल्वे स्थानकात पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाऊन दिशेच्या मेल किंवा एक्सप्रेस गाड्या या जलद मार्गावर पुढे वळवल्या जातील आणि त्या 15 मिनिट उशिरानं धावतील. तर सीएसएमटी पासून तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी तसंच चुनाभट्टी पासून तर वांद्रे जाणाऱ्या लोकल ट्रेन सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहतील.तर छत्रपती शिवाजी टर्मिनल पासून हरभर मार्गावर वडाळा रोडकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन सकाळी सव्वा अकरा ते सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत बंद राहतील. तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनल ते बेलापूर पनवेल रेल्वे स्थानकासाठी सुटणारी हार्बर लोकल सेवा सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून पश्चिम रेल्वे मार्गावर जाणाऱ्या वांद्रे ते गोरेगाव पर्यंतच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 10:45 वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहतील. याप्रमाणे गोरेगाव आणि वांद्रे येथून देखील छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे जाणारी लोकल सेवा सकाळी पावणे अकरा वाजेपासून सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत बंद राहील.