मुंबई Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आज सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत विविध अभियांत्रिकी तांत्रिक आणि देखभालीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवारी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नाही. त्यामुळं ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना सुट्टीच्या दिवशी काहीसा दिलासा मिळालाय.
कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 09ः57 ते दुपारी 01ः50 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/नीम जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर पोहोचतील. तसंच त्यांच्या निर्धारित वेळेच्या आगमनापेक्षा 10 मिनिटे उशीरा चालतील. सकाळी 10ः39 ते 02ः58 पर्यंत कल्याण इथून सुटणाऱ्या अप जलद/नीम जलद सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड पुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिट उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
- मेल/एक्सप्रेस वर काय परिणाम होणार : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
- पश्चिम रेल्वेवर कधी मेगाब्लॉक : पश्चिम रेल्वे वर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माहीम रेल्वे स्थानकापासून ते सांताक्रुज रेल्वे स्थानकापर्यंत जलद मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र, अंधेरी ते हर्बर मार्गावर जाणाऱ्या लोकल ट्रेन या पाच तासाच्या दरम्यान चालू राहतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलीय.
- हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही :मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असला तरी मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे ते पनवेल दरम्यानच्या ट्रान्सहार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलंय.