मुंबई - देशात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आजच्या अर्थसंकल्पातून देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योगांना प्रेरणा मिळणार अशी प्रतिक्रिया कार्पोरेट लॉ आणि महिला विषयक विविध प्रश्नाच्या संदर्भात काम करणाऱ्या कल्पना उनादकात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना उनादकात
शुक्रवारी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून महिला सक्षमीकरण यासोबतच महिलांच्या नेतृत्व संदर्भात मोठा भर देण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या आर्थिक विकासासंदर्भात अनेक योजना जाहीर झाल्याने त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे.
देशात आजही अनेक महिला घरून विविध प्रकारचे उद्योग करतात. त्यांना आज या अर्थसंकल्पातून अधिक लाभ होणार आहे. स्टार्टअपचा नवीन विकसनशील असा कार्यक्रम सरकारने जाहीर केला असल्याने त्यातून नवीन उद्योगांना सुरू करण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः स्टार्टअपला या सरकारने महत्त्व दिले असल्याने नवीन उद्योग सुरू करणे सोपे होणार आहे. त्यातूनच अनेक तरुणांचे आणि बेरोजगारांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे उनादकात म्हणाल्या.
देशात यापूर्वी ऊर्जा, मेक इन इंडिया इत्यादी अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र, कौशल्यावर फार भर देण्यात आला नव्हता. या सरकारने भाषाज्ञान आणि त्यासाठीच्या विषयावर भर दिला असल्याने तरुणांना परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. कामगार विषयक कायदे यावरही भर देण्यात आल्याने यातून उद्योग वाढीस मदत होईल आणि रोजगारही वाढतील अशी प्रतिक्रियाही कल्पना उनादकात यांनी दिली