मुंबई Mumbai International Airport -जगातील आणि देशातील अत्यंत गजबजलेलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे पावसाळ्यानंतरच्या धावपट्टीची देखभाल करण्यासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत. 17 ऑक्टोबर सकाळी 11 वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील.
देखभाल दुरुस्ती गरजेची -मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील रहदारी दिवसेंदिवस वाढलेली आहे. दररोज 900 पेक्षा अधिक विमानांची उड्डाणं दोन्ही धावपट्टीवरून केली जातात. परंतु पावसाळ्यानंतर धावपट्टीवर अनेक प्रकारची देखभाल दुरुस्ती गरजेची असते. मुंबईत पडणारा धो धो पाऊस, यामुळे धावपट्टीची क्षमता कमी होते. धावपट्टीवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात. काही ठिकाणी बारीक बारीक खडे वरती येतात. त्यामुळे विमानांच्या चाकांना त्याचा त्रास होऊ शकतो. यातून अपघात होण्याची शक्यताही असते. म्हणूनच ही धावपट्टी नीट करण्यासाठी तब्बल सहा तास दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत.
मे 2023 मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 43 लाख 43,806 एकूण प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले प्रवासी 21 लाख 960 तर मुंबईतून विदेशात उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या 22 लाख 34,199 इतकी होती. अत्यंत गजबजलेल्या अशा या धावपट्टीवर पावसाळ्यानंतरची देखभाल दुरुस्ती ही दरवर्षी केली जाते. यंदा देखील ती 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले आहे.