मुंबई -काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस, मुंबईत काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. एका आठवड्याच्या ब्रेकनंतर या आठवड्याच्या शेवटी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज (मंगळवार ता. 30) रात्रभर शहरासह उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीवर आणि अंतर्गत भागात तसेच मुंबईत उत्तर-पश्चिम मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातसुद्धा अशीच परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मागील तीन तासात दक्षिण मुंबई आणि आसपासच्या परिसरात 90 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला असल्याचेही, हवामान खात्याने म्हटलं आहे.
आयएमडी जीएफएस मॉडेल मार्गदर्शनानुसार, २ जुलैपासून उत्तर कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मुंबई व आसपासच्या भागात 2 ते 4 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, यासंदर्भात मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे.
असा आहे हवामान खात्याचा अंदाज -
- ३० जून - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
- १ जुलै - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
- २ जुलै - कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
- ३ जुलै - कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हेही वाचा -नागपुरात जगातील सर्वांत मोठे प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्र; मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
हेही वाचा -कोरोना काळात 'ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी' ठरतेय संजीवनी