महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता मायक्रोस्कोपप्रमाणे होणार स्मार्टफोनचा वापर, मुंबई आयआयटीच्या संशोधकांचा शोध

मायक्रोस्कोपमध्ये वापरण्यात येणार्‍या लेन्स या साधारणपणे पॉलीश काचा किंवा मोल्डिंग प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात. या लेन्स फारच महागड्या असल्याने त्यापासून बनवण्यात येणारी उपकरणे महागडी असतात. मात्र, आयआयटीमधील संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनामुळे महागड्या लेन्स आता फारच स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. तसेच त्याचा वापर स्मार्टफोनमध्येही करता येणार असल्याने संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.

लेन्सच्या साहाय्याने स्मार्टफोनवर पेशींचे निरीक्षण करताना संशोधक

By

Published : May 17, 2019, 11:09 AM IST

मुंबई - रक्तातील पेशी पाहण्यासाठी किंवा अन्य पेशींचा अभ्यास करण्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे भारतीय चलनातील बनावट नोटा ओळखण्यासाठीही विशेष प्रकारच्या लेन्सचा वापर केला जातो. हे सर्व प्रयोगशाळेतच शक्य असते. मात्र, मुंबई आयआयटीमधील संशोधकांनी बनवलेल्या एका विशिष्ट लेन्समुळे रक्तामधील पेशींसह बनावट नोटा आता स्मार्टफोनद्वारे पाहता येणे शक्य होणार आहे.

मुंबई आयआयटीतील संशोधन विभाग

मायक्रोस्कोपमध्ये वापरण्यात येणार्‍या लेन्स या साधारणपणे पॉलीश काचा किंवा मोल्डिंग प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात. या लेन्स फारच महागड्या असल्याने त्यापासून बनवण्यात येणारी उपकरणे महागडी असतात. मात्र, आयआयटीमधील संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनामुळे महागड्या लेन्स आता फारच स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. तसेच त्याचा वापर स्मार्टफोनमध्येही करता येणार असल्याने संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.
आयआयटीमधील संशोधकांनी एका विशिष्ट प्रकारच्या लिक्विडचा शोध लावून त्याचा वापर लेन्स बनवण्यासाठी केला आहे. लिक्विडपासून बनवण्यात आलेली ही लेन्स हाताळणे तसेच स्थिर ठेवणे हे संशोधकांसाठी आव्हान होते. संशोधकांनी पॉलिडायमेथालसिलोक्सेनचा (पीडीएमएस) वापर करून बनवलेले हे लिक्विड ग्लिसरॉल किंवा पाण्यामध्ये मिसळत नाही. एखाद्या द्रवपदार्थामध्ये ते ओतल्यास त्या द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावर पीडीएमएस चंद्राकृती आकार दिसते. त्यावर एअर गनच्या माध्यमातून विशिष्ट दबाव आणल्यानंतर ते त्याचा आकार बदलत असते. त्यामुळे त्यापासून एक उत्तम लेन्स बनवण्यास मदत होत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले.

हे संशोधन बायोमेडिकल ऑप्टिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईमध्ये पीएचडीच्या संशोधनामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मायक्रोस्कोपमधील लेन्समध्ये व्यवस्थित प्रकाश न आल्यास चित्र स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे संशोधनात अडथळे येत असे. हे अडथळे दूर करण्यासाठी आम्ही पर्यायी तंत्रज्ञान विकसित केल्याचे डॉ. भुवनेश्वरी करुणाकरण यांनी सांगितले. विशेष म्हणजे या नव्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या लेन्समुळे पारंपरिक लेन्सच्या तुलनेत अधिक स्पष्ट, उत्तम आणि चांगले परिणाम येऊ लागल्याचेही त्यांनी सांगितले.

पीडीएमएसच्या माध्यमातून बनवलेल्या लेन्सवर संशोधकांनी अधिक संशोधन करत ‘स्मार्टफोन मायक्रोस्कोप’ ही लेन्स बनवली. ही लेन्स स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यामध्ये सहजगत्या बसवता येते. ऑप्टिकल मायक्रोस्कोपच्या तुलनेत हा मायक्रोस्कोप १.४ मायक्रोमीटरपर्यंत वस्तूचे पृथ्थकरण करते. स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणार्‍या लेन्समुळे नोटांमधील सुक्ष्म बाबीही सहज लक्षात येतील, असे संशोधकांनी सांगितले. त्याचप्रमाणे या लेन्सचा वापर बायोमेडिकल संशोधनासाठीही करता येऊ शकतो. यामध्ये मलेरिया झालेल्या व्यक्तीच्या रक्ताची तपासणी करण्याबरोबरच एंडोस्कोपीमध्येही लेन्स वापरता येऊ शकते. शुक्राणूंची मोजणी, दातांची पाहणी तसेच काही सर्जिकल प्रक्रियेसाठीसुद्धा ही लेन्स वापरता येऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे पाण्यातील घटक आणि फॉरेन्सिक अ‍ॅप्लिकेशनसाठी याचा वापर करता येणार असल्याचे डॉ. भुवनेश्वरी करुणाकरण यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details