मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आर्थिक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या नदीम अली याला दुबईतून मुंबईत येण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मुदत दिली आहे. नदीम हा एसी मेकॅनिक असून मुंबईतील एका आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात त्याच्यावर 2018मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता मुंबईमध्ये येण्यासाठी त्याला जानेवारीपर्यंत मुदत उच्च न्यायालयाने दिली आहे. त्यानंतर त्याला दिवाणी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता.
अटकपूर्व जामीनानंतर दुबईत जाण्याची दिली परवानगी
दिवाणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन देत असताना त्याला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, दुबईमध्ये नोकरी मिळत असून यासाठी पासपोर्टची गरज असल्याचा अर्ज त्यानेकेला होता. या याचिकेवर सुनावणी घेऊन दिवाणी न्यायालयाने नदीमला पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय आर्थिक गुन्ह्यासंदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी त्याने याचिका दाखल केली होती. दुबईमध्ये मिळालेली नोकरी ही दोन वर्षांची असून यासाठी दुबईमध्ये राहावे लागेल, असे त्याने याचिकेत म्हटले होते. त्याचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला सुनावणीच्या वेळी गैरहजर राहण्याची मुभा दिली होती. न्यायालयाने नदीमला सप्टेंबरपर्यंत दुबईत राहण्याची अनुमती दिली होती.
मुदतवाढ देण्यास दिवाणी न्यायालयाचा नकार
सप्टेंबरनंतर नदीम अली याला तात्काळ मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे व त्याचा कंपनीसोबत झालेला करार हा जानेवारीपर्यंत असल्यामुळे त्याने पुन्हा दिवाणी न्यायालयमध्ये याबद्दल मुदतवाढ मागितली होती. मात्र न्यायालयाने ही मुदतवाढ देण्यास नकार दिल्यामुळे नदीम अलीकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.