मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. अजित पवार व हसन मुश्रीफ यांच्यासह इतर राजकीय नेत्यांविरोधात येत्या 5 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेला या संदर्भात येत्या 5 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मिळाले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण; अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यावर दाखल होणार गुन्हे
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे राज्यातील काही साखर करखाने व सूत गिरण्यांना कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, ही वाटण्यात आलेली कर्जे पुन्हा वसूल न झाल्याने बँकेला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता. कर्ज वाटप करण्याच्या काळात बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार, हसन मुश्रीफ व शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता. ज्या सूत गिरण्या व साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आली, त्यांचा राष्ट्रवादी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला होता.
राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, प्रसाद तनपुरे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, दिवंगत पांडूरंग फुंडकर मिनाक्षी पाटील, आनंदराव अडसूळ, जगन्नाथ पाटील, तानाजीराव चोरगे, जयंत पाटील, जयंतराव आवळे, दिलीप सोपल, राजन तेली, विलासराव जगताप, रजनीताई पाटील, माणिकराव कोकाटे इत्यादींवर गुन्हे दाखल होणार आहे.