मुंबई -राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जाहीर टीका केल्यामुळे दाखल झालेला मानहानीचा खटला रद्दबातल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या याचिकावर आज (दि. 22) सुनावणी झाली या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात 20 डिसेंबरपर्यंत कारवाई करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ता महेश श्रीमल यांनी गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत गिरगाव न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावत प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना आज हंगामी दिलासा मिळाला. मानहानीच्या या खटल्यात 20 डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाला दिले आहे.
महेश श्रीमल मानहानीची तक्रार केली आहे. ही तक्रार रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्या अर्जावर आज न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी तक्रारदारांचे वकील रोहन महाडिक यांनी राहुल गांधी यांच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली.