मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आता पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी 'मला अल्पशी लक्षणे जाणवत आहेत. मी विलगिकरणात राहण्याचा निर्णय घेत आहे', असे ट्विट करून ही माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शेख हे मालवणी या विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चालला आहे. या विभागात तसेच पालकमंत्री म्हणून काम करताना शेख यांचा अनेकांशी थेट संबंध आला आहे. त्यामुळे त्यांना लागण झाली असावी, असे शेख यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.