मुंबई - कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्याने एप्रिलमध्ये महाराष्ट्रात दुसरी लाट आली होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाण्यास सर्वत्र निर्बंध घालण्यात आले होते. आता मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होऊन दुसरी लाट आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मैदाने, उद्याने, चौपाट्या आणि समुद्र किनाऱ्यांवर मुंबईकरांना जाण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मैदाने, उद्याने, चौपाट्या आणि समुद्र किनारे पुन्हा गजबजणार आहेत.
सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी -
राज्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात निर्बंधांमध्ये शिथीलता दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील मैदाने, उद्याने, चौपाट्या आणि समुद्र किनारे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे परिपत्रक पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी जारी केले आहे.
मुंबईत या निर्बंधांमध्ये दिलीय शिथीलता -
- सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वैद्यकीय दुकाने आठवड्यातील सर्व दिवस २४ तास सुरू ठेवू शकतात.
- सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे.
- जलतरण तलाव आणि निकटचा संपर्क येऊ शकतो, असे क्रीडाप्रकार वगळून इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी आहे.
- चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.