मुंबई :गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम आता अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. ज्या कंत्राटदारांनी आता कामं केली नाहीत आणि आतापर्यंत वेळ वाया घालवला त्यांच्या विरोधात सरकार कारवाई करत आहे. तसंच आता नव्याने कंत्राटदारांना कामं दिली असून ही कामं वेगात सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या भाविकांना किमान मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन वापरता यावी यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने या रस्त्याच्या कामाची पाहणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि भाविकांना या मार्गावरून जाता येईल असा दावा सरकारच्या वतीनं चव्हाण यांनी केला आहे.
सरकारकडून कामामध्ये फसवणूक :मुंबई-गोवा महामार्गाचं काम जरी सध्या वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी पायी जाऊन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे काम वेगात सुरू केलं असून काम पूर्ण होत असल्याचा दावा या निमित्ताने सरकार करत आहे; मात्र हे काम म्हणजे जनतेची आणि प्रवाशांची फसवणूक असल्याचा चिले यांचा दावा आहे.