मुंबई :मुंबई गोवा महामार्ग आणि त्याचे चौपदरीकरण हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असले तरी हा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही. कोकणातील दिग्गज मंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री यांनी या रस्त्याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही विविध अडचणींमुळे हा रस्ता अद्यापही पूर्ण होऊ शकलेला नाही. मात्र आता या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल, असा दावा राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी एक मार्ग सुरू :या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे भाविक या मार्गावरून मोठ्या संख्येने प्रवास करतात. अशा भाविकांना किमान यावर्षी तरी या रस्त्याचा एक मार्ग वापरता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच एक मार्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
महामार्गाच्या कामात तांत्रिक अडचणी :महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असल्याने राज्य सरकार केंद्र सरकारच्या रस्ते विकास विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी वारंवार चर्चा होत आहे, मात्र कंत्राटदार बँका, लाभार्थी अशा अनेक अडचणींमुळे काम रखडले आहे. कामांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या आहेत, मात्र त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही चव्हाण म्हणाले. भूसंपादनाची सर्व कामे पूर्ण झाली असून सर्व लाभार्थ्यांना पैसे वाटप करण्यात आले आहेत.