मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद राहणार मुंबई : सध्या गणेशोत्सवाच्या जल्लोषाचं सगळ्यांना वेध लागले आहेत. त्यामुळे मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहेत. मात्र कोकणात जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्यानं प्रशासनानं मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आजपासून बंद केली आहे. मुंबई पोलीस दलातील वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी 27 ऑगस्ट 2023 ते 27 सप्टेंबर 2023 या एक महिन्यात मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद राहणार असल्याचे आदेश जारी केले आहेत. मुंबईगोवा महामार्गावर गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी राहणार आहे.
हा असेल पर्यायी वाहतूक मार्ग :मुंबई गोवा महामार्ग 66 वर अवजड वाहनांना वाहतुकीस पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहनांना मुंबई पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. यात जुन्या मुंबई मार्गावरील पळस्पे फाटा, कोळखे गाव, कोन फाटा, कोन गाव, एक्सप्रेस ब्रिज, पुणे मुंबई द्रुतगती मार्ग, खालापूर, पाली फाटा, वाकण फाट्यावरुन गोवा महामार्ग असं जाता येणार आहे. तसचं पुणे मुंबई महामार्ग क्रमांक 4 वरुन पुण्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांनाही मुंबई गोवा महामार्ग 66 वर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून कोन फाटा, कोन गाव, एक्सप्रेस ब्रिज, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, खालापूर पाली फाटा, वाकण फाट्यावरुन गोवा महामार्ग असं जाता येईल.
या अवजड वाहनांना असेल बंदी :मुंबई-गोवा महामार्गावरुन अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांमध्ये 16 टनपेक्षा जास्त वजनाच्या सर्वच वाहनांना मुंबई गोवा महामार्गावरुन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर आदी सगळ्या प्रकारची जड वाहनं मुंबई गोवा महामार्गावर नेण्यास बंदी असल्याचं वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
गणेशोत्सवासाठी रस्त्याचं बांधकाम सुरु :मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि उखडलेल्या रस्त्याचं बांधकाम गणेशोत्सवापूर्वी करण्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं होतं. त्यामुळे या रस्त्याचं बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलं आहे. सध्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहे. काम सुरू असल्याचं पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मुंबई पोलिसांना दिलं आहे.
गणेशभक्तांना करावा लागतो वाहतूक कोंडीचा सामना :कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठ्या वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो. मुंबई गोवा महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात मुंबईत आणि गोव्यात विविध प्रकारची वाहतूक करण्यात येते. हा कोकणातील महत्वाचा मार्ग असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गणेशभक्तांना वाहनाच्या लांबच लांब रांगामधून तासोंतास थांबावं लागत असल्यानं प्रशासनाकडून अवजड वाहतुकीसाठी मुंबई गोवा महामार्गावर बंदी घालण्यात येते.
- मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक :मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेनं कोकण जागर परिषद आयोजित केली होती. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात मनसेनं पदयात्रा काढली होती. आज या पदयात्रेचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कोलाड आंबेवाडी नाका इथं समारोप होणार आहे.
हेही वाचा -
- Mumbai Goa Highway Starts : कोकणवासीयांना खुशखबर, गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्ग सुरू
- Mumbai Goa Highway : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन 'या' तारखेपर्यंत होणार पूर्ण
- Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं; मनसेचा आरोप