महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकांनो मुलांना जपा, १९ वर्षीय मुलीनं तणावातून केली आत्महत्या

मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडलीय. येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं निवासी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची माहिती डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिलीय.

file photo
file photo

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 11:34 AM IST

मुंबई : डी. एन. नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विले पार्ले येथील मिठीबाई कॉलेजच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने बुधवारी सकाळी तिच्या निवासी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, मृत तरुणीकडे मिळालेल्या सुसाईड नोटवरून ती मानसिक तणावाखाली होती. त्याच नैराश्यातून तिनं आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मृत मुलीच्या पालकांचे जबाब नोंदवले जाणार आहे. या जबाबानंतर तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होईल. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

इमारतीवरून मारली उडी : अंधेरीतील एस. व्ही. रोड येथील मिलेनियम हाईट्स इमारतीत बुधवारी सकाळी ही घटना घडली. ही मुलगी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर भाडेकरू म्हणून राहत होती. तिचे आई-वडील ठाण्यात राहतात. ती मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत होती. ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. नैराश्येतून तिने सकाळी इमारतीवरून उडी मारत आपले जीवन संपवल असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. ही घटना इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास येताच सोसायटी पदाधिकारी आणि डी. एन. नगर पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सिंगला जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या मुलीच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकलं नाही.

काहीही संशयास्पद आढळले नाही : या प्रकरणात आत्तापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने प्रथम तिचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. सोसायटीच्या इतर सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या कुटुंबाला या घटनेबद्दल माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळले नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळजनक वारावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणाचा सध्या डी. एन. नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details