मुंबई - 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', असा जयघोष करत, ढोल ताशांचा गजरात गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला. मुंबईत आज (शुक्रवार) 6 वाजेपर्यंत 38 हजार 260 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक 7,627 तर घरगुती 30, 403 मूर्तींचा समावेश आहे.
मुंबईमध्ये 38 हजार 169 गणेश मूर्तींचे विसर्जन
मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवस भक्ती भावाने गणरायाची पूजा केली जाते. मुंबईमध्ये काल (गुरुवार) सकाळपासूनच गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. दुपारनंतर चौपाट्या, नद्या, कृत्रिम तलावावर गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली होती.
हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत थायलंडमधून आलेल्या भाविकांचा बाप्पांना निरोप
मुंबई महानगरपालिकेने 69 नैसर्गिक स्थळांवर विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. सोबतच 32 कृत्रिम तलावांचीही निर्मिती करण्यात आली होती. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांचे 40 हजार जवान तैनात होते. या व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाने 300 लाईफगार्ड समुद्र किनारी तैनात केले होते. समुद्र किनारी स्वच्छतेसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी होते. यामुळे मुंबईमध्ये कोणतीही अनुचित घटना न घडता विसर्जन पार पडले.