मुंबई Datta Dalvi Car vandalized: उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. या टीकेनंतर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर वाद अजून चिघळला आहे. मात्र, आज सायंकाळी दत्ता दळवी यांच्या विक्रोळी येथील इमारतीत पार्क केलेल्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तीन ते चार अज्ञात तरुणांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात (Vikhroli Police Station) चार अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य : दत्ता दळवी यांच्या निवासस्थानी येऊन अज्ञात चार तरुणांनी दळवी यांच्या गाडीच्या काचा फोडून दहशत निर्माण केली आहे. दगडाने आणि लाकडाने दळवी यांच्या गाडीवर हल्ला करून काचा फोडण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ आणि सीसीटीव्हीही समोर आला आहे. माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणी आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली होती. तक्रारदार भूषण पलांडे या व्यक्तीने, दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 153(A),153 (B), 153(A)(1)सी, 294, 504,505(1)(C) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.