मुंबई Mumbai Fire News : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरातील 'जय भवानी' इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीला आटोक्यात आणण्यात युद्ध पातळीवर काम करण्यात आलंय. या घटनेत जवळपास 30 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग लागल्यानंतर इमारतीतून जवळपास 30 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. दरम्यान ही आग कशामुळं लागली याचा तपास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून व स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
51 जण जखमी : गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवर असलेल्या जय भवानी इमारतीत पहाटे 3 च्या सुमारास ही आग लागली होती. ही इमारत ग्राउंड प्लस सात मजल्याची होती. लेवल दोनची ही आग असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलानं दिलीय. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. तर या आगीत 51 जण जखमी झाले असून यातील 14 जण गंभीर जखमी आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकानं आणि समोरील पार्कींग असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.