मुंबई Mumbai Double Decker Bus : मुंबई दर्शनासाठी पर्यटकांचं आणि मुंबईकरांचं आकर्षण असलेल्या बेस्टच्या ओपन डबल डेकर बसची आज शेवटची सफर असणार आहे. या गाड्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्या आता वाहतुकीतून बंद करण्याचा निर्णय वाहतूक नियमानुसार पालिकेनं घेतलाय. या गाड्यांच्या जागी आता नवीन 10 ओपन डबल डेकर बस दाखल होतील, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलीय. बेस्टच्या ताब्यात असलेल्या जुन्या ओपन डबल डेकर बस गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबईकरांना अविरतपणे आपली सेवा देत आहेत. अखेर या बसचा कार्यकाळ संपल्यानं या गाड्यांना आता निवृत्ती देण्यात आलीय.
दर महिन्याला 20 हजार पर्यटक घेत होते मुंबई दर्शन :बेस्ट प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी 1997 ला एमटीडीसीच्या सहकार्यानं बेस्टनं ओपन डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत आणल्या. यात ओपन अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. या बसनं प्रवासी व पर्यटकांनी मुंबई दर्शनाचा पुरेपूर आनंद आतापर्यंत लुटलाय. पूर्वी ओपन डेक बसमधून पश्चिम उपनगरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येत होत्या. नंतर 3 नोव्हेंबर 2021 पासून दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ओपन पर्यटन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी आणि दुपारी सुरू असलेल्या या सेवेच्या वेळेत वाढलेल्या उन्हामुळं वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. त्यानंतर या बसच्या फेऱ्या संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ पर्यंत होऊ लागल्या. या बसमधून दर महिन्याला अंदाजे वीस हजार पर्यटक मुंबई दर्शनाचा आनंद घेत होते.